भारतीय जनता पक्षाचे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला . विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे आगामी विधानसभेसाठी महायुतीने कंबर कसली असतानाच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तत्पुर्वी आज सकाळीच भालेराव यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत सुधाकर भालेराव यांना शरद पवार गटाकडून संधी मिळते. विशेष म्हणजे राज्याचे क्रीडामंत्री, अजितदादा गटाचे आमदार संजय बनसोडे हे सुद्धा उदगीर मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे बनसोडे यांच्याविरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.