पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका इसमाने मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.५) दुपारी उघडकीस आली आहे.या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलगा व पती पत्नीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे, दुर्वेश रोकडे यांचा मृतांमध्ये समावेश असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानन रोकडे, पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते.
याबाबत मयत गजानन रोकडे याचा भाऊ विजय भगवान रोकडे (रा.उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे) याने रात्री उशिरा पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा भाऊ मयत गजानन याने त्याची पत्नी पौर्णिमा हिच्याशी मोटारसायकल वर जात असताना झालेल्या भांडणाच्या रागातून मुलगी चैताली व मुलगा दुर्वेश यांना विषारी औषध पाजले. मुलगा दुर्वेश याला नंतर पाण्याच्या डबक्यात फेकून दिले. पत्नी पौर्णिमा हिलाही विषारी औषध पाजले, नंतर तिचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वत: ही गळफास घेवून आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हंटले आहे.
या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून नऊ वर्षांची मुलगी चैताली रोकडे ही बचावली आहे. या घटनेने वारणवाडीसह पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.