अहिल्यानगर : सारोळा कासार येथील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
नगर – राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त शिक्षक व नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील रहिवासी नामदेव सखाराम धामणे (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 5 जानेवारी रोजी घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नामदेव धामणे यांनी गळफास घेतल्याचे समजताच त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली असता ते मयत झाले असल्याचे सांगितले.
तशी माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. मयत धामणे यांच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्याचे माझ्या आत्महत्येस कोणासही दोषी धरू नये असे लिहिलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील गाडेकर मळा येथे ते कार्यरत होते. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.मयत नामदेव धामणे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.






