देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारिजात पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. देशाचा निकाल ठरला असून, नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले.
गुढीपाडव्याच्या निमित्त अहिल्यानगर येथील प्रोफेसर चौक ते पारिजात चौक येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांरपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांना विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुढीपाडवा आणि हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिशा दिली असून, हा केवळ ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात मोदींच्या माध्यमातून भारत आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. भारतातील जनतेने मोदींचे नेतृत्व स्वीकारले असून या निवडणुका केवळ औपचारिकता आहे. येत्या ४ जूनला ४०० पारचे ध्येय सहज गाठता येणार आहे. मोदींच्या माध्यमातून ५०० वर्षापासून रखडलेलल्या प्रभूरामचंद्राच्या मंदिराची निर्मिती झाली यामुळे देशात हिंदुत्वाला मोठे बळ आले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढी पाडव्याचा सण हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. रामायण काळात गुढी पाडव्याच्या दिवशी रावणाच्या अत्याचारातून रामाने लोकांना मुक्त केले. तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता. त्याचप्रमाणे मोदींच्या नेतृत्वात देशातून भ्रष्टाचार, दडपशाही आणि हिंदू विरोधी शक्तींचे उच्चाटन होऊन देशात हिंदूत्वाचा पाया मजबूत होईल असा आत्मविश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुजय विखे यांनी आपल्या प्रचारातून लोकांचा संपर्क वाढविला आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.