Sunday, December 8, 2024

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे आव्हान देणार ! विधानसभा लढवण्याबाबत मोठं विधान

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून पराभव झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे आता विधानसभा लढवण्याच्या तयारीला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत सूचक भाष्य करत संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखे यांनी आपल्याला पक्षाने संधी दिल्यास संगमनेरमधून विधानसभा लढवायला आवडेल, असं मोठं विधान आज (१६ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे हे थेट आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे.

“निळवंडे धरणाचं काम झाल्यामुळे निळवंडेचं पाणी सर्व गावांमध्ये गेलं आहे. खरं तर निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ हा संगमनेर आणि राहाता तालुक्यातील लोकांना होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर भारतीय जनता पक्षाने आदेश दिला आणि जर पक्षाला जी जागा सुटली तर नक्कीच मला संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवायला आवडेल. यामध्ये पक्ष संघटनेचा जो काही आदेश राहील, त्या आदेशाला बांधिल राहून काम करत राहू”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांपूर्वी राहुरी मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारला की, मागणी राहुरीची आहे आणि तुम्ही संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याचं म्हणत आहात? या प्रश्नावर बोलताना सुजय विखे म्हणाले, “मी असाच आहे, ज्या ठिकाणी मागणी असते, त्या ठिकाणी मी जात नाही”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ नेमकी काय? याबाबतही आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles