पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक खासदार म्हणून जी काही विकासकामे मी आजवर केली आहेत, त्या विकासकामांच्या जोरावरच मी मतदान मागणार असे मत आज खा. विखे पाटील यांनी मांडले. पोखर्डी व कापुरवाडी ता. नगर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
जलसंधारण विभाग अंतर्गत पोखर्डी येथे वन जमीन अंतर्गत कोल्हापूर बंधारा बांधणे व पोकळी ते गावठाण अंतर्गत कोल्हापूर बंधारा बांधणे – अंदाजे रक्कम २.३४ कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वारुळवाडी पोखर्डी-ढवळे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे – अंदाजे रक्कम ३.१९ कोटी, २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत पोखर्डी येथे स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण करणे – अंदाजे रक्कम १० लक्ष, ३०५४ योजनेअंतर्गत शेंडी-पोखर्डी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर सिडी वर्क बांधणे – अंदाजे रक्कम ३० लक्ष तसेच पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विकास कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान खासदार विखे म्हणाले की, विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रवासात दीड वर्षाच्या राज्य सरकारच्या कालावधीमध्ये कर्डिले साहेबांच्या यांच्या नेतृत्वात नगर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विविध कामांचे भूमिपूजन केले आहे आणि विशेष म्हणजे ही विकासकामे केवळ सहा महिन्यात पूर्ण केली आहेत. इतक्या गतीने आणि कुठलेही दुर्लक्ष न करता समाजहित जोपासत ही विकासात्मक वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मी जी काही विकासकामे माझ्या कारकीर्दीत केली आहेत ती जनतेसमोर मांडणार आणि मग या जिल्ह्यातील गोर गरीब जनताच ठरवेल की पुढील खासदार कोण असणार. खासदार कोण होणार हे चार-पाच पुढारी ठरवू शकत नाही.
शिवाजीराव कर्डिले आणि मी फक्त विकासासाठी एकत्र आलो आहे. येथील कामाच्या बाबतीत कर्डिले साहेब आमचे छाननी समिती आहे. त्यामुळे छाननी समितीकडून आलेले काम कुठलेही आडेवेडे न घेता करतो. सद्या कोणत्या बँकेत कोणाचे खाते आहे, रात्री – अपरात्री कोण कुठे जाते, कोण कोणाच्या चादरीत हे सगळे मला माहिती आहे. माझ्या कडे याचे व्हिडिओसह सर्व गोपनीय अहवाल आहे. वेळ आल्यावर हा गोपनीय अहवाल आमचे छाननी समितीकडे सुपूर्द करेल मग त्यांनी ठरवावे कधी कोणता व्हिडिओ रिलीज करायचा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच येणाऱ्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, अहमदनगरच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपण सर्वांनी या उपक्रमांमध्ये सहभाग दर्शवून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन देखील खासदार सुजय विखेंनी उपस्थित नागरिकांना केले.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, अनेक दिवसानंतर येथील गावांना खा. विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाचा अनुशेष भरुन काढत आहे. दोन्ही गावांना कोटींची निधी प्राप्त करून गावात विकासाची गंगा आणली आहे. गेल्या ४ वर्षात येथील लोकप्रतिनिधी फक्त नारळ फोडण्याचे काम केले आहे. मी कधीही गावांना वेगळे मानले नाही. सर्व गावे माझेच कुटुंब असल्याचे मी मानतो. मी माझ्या काळात मंजूर केलेल्या कामांचे सद्याचे लोकप्रतिनिधी उद्घाटन करत आहे.
तसेच काही जणांना खासदारकीचे स्वप्न पडत आहे. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लढवू द्या. परंतु आपण पुन्हा एकदा खा. सुजय विखे पाटील यांना खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले व अक्षय कर्डिले यांची देखील समायोचित भाषणे झाली. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे, रबाजी सुळ, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, मधुकर मगर, सुधीर भापकर, मंजाबापू आव्हाड, संजय गिरवले, दत्ता तापकिरे, भाऊसाहेब ठोंबे, धर्मनाथ आव्हाड, जगन्नाथ मगर, भगवान आढाव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.