Saturday, May 25, 2024

निलेश लंके, डॉ.सुजय विखेंनी निवडणूक प्रचारात केला ‘इतका खर्च…मोदींच्या सभेसाठी….

नगरःनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी ८ मेपर्यंत ५४ लाख ६० हजार ४५३ रुपये तर याच तारखेपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी ३१ लाख ४ हजार ६९७ रुपये लोकसभा निवडणूक प्रचारावर खर्च केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचा खर्च नगरमधील उमेदवार विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये विभागून दाखवला गेला आहे. या पंतप्रधानांच्या या एकाच सभेसाठी ३९ लाख रुपयांचा खर्च दाखवला गेला आहे.

निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दैनंदिन निवडणूक खर्च सादर करावा लागतो. निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा ९५ लाख रुपये आहे. ३ मे, ७ मे व ११ मे या तीन दिवशी निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ घातला. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व निवडणूक यंत्रणेने टिपलेला खर्च याचा ताळमेळ तीनदा घातला गेला. त्यानुसार दि. ११ मे रोजी सर्व म्हणजे २५ उमेदवारांच्या ८ मेपर्यंत केलेल्या खर्चाचा ताळमेळ घालण्यात आला आहे. ८ मेपर्यंतचे हा खर्च निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक रिंगणातील तिसरे प्रमुख उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे दिलीप खेडकर दि. ३ व १२ रोजी ताळमेळ सादर करण्यासाठी अनुपस्थित होते. त्यांनी मुदतवाढ मागितलेली आहे. प्रमुख विखे व लंके या दोन्ही उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.

यानंतर आता सर्व अंतिम खर्च, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे, ४ जूननंतर २६ व्या दिवसापर्यंत अंतिम खर्चाचा ताळमेळ घातला जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक पुन्हा नगरमध्ये दाखल होतील. यामध्ये निवडणूक निकालाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या जल्लोषाचा खर्चही समाविष्ट केला जाणार आहे.

मुख्यमंत्री सभेचा खर्च ५ लाख ३८ हजार रू.

महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या दिवसाचा विखे यांच्या प्रचाराचा खर्च ५ लाख ३८ हजार रुपये दाखवण्यात आला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांनी साध्या पद्धतीने, कोणताही जल्लोष न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. या दिवसाचा खर्च २९ हजार ९२० रुपये दाखवण्यात आला आहे.

शरद पवार यांच्या चार सभांचा खर्च १२ लाख ३४ हजार रु.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेचा खर्च सुजय विखे व सदाशिव लोखंडे या दोन उमेदवारात विभागून दाखवण्यात आला. सभेत दोघेही व्यासपीठावर उपस्थित होते. लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या नगर, श्रीगोंदा, शेवगाव व राहुरी येथे चार सभा झाल्या. या दिवसांचा एकूण खर्च १२ लाख ३४ हजार २२५ रुपये दाखवण्यात आला आहे. पवार यांची राहुरीतील सभा सर्वाधिक खर्चिक ठरली. तिचा खर्च ६ लाख २८ हजार २५० रुपये दाखवण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles