आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बारातमी लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबियांचा हक्काचा मतदारसंघ आहे. सध्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना येथून कोण आव्हान देणार याकडे सर्वाचं लक्ष आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या येथून निवडणूक लढू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक खरंच लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र कार्यकर्त्यांची याबाबचे बॅनर झळकवण्यास सुरुवात केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या शुभेच्छा बॅनरवर संसदेचा फोटो दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे भागात हे बॅनर लागले आहेत.
बॅनरवर सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा, असा उल्लेख करण्यात आला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उमेदवार असणार का? ही चर्चा आता आणखी जोर धरु लागली आहे.