बॉलिवूडची गाजलेली गायिका सुनिधी चौहान हिने आपल्या गोड गळ्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सुनिधीने नुकतीच राज शमानी याच्या पॉडकास्टला हजेरी लावली. यात तिने हे रिऍलिटी शो खोटे असल्याचं सांगितलं. सोबतच तिने परीक्षक म्हणून तिचा अनुभवही शेअर केला. पॉडकास्टमध्ये बोलताना सुनिधी म्हणाली, ‘आताचे सिंगिंग रिऍलिटी शो हे खोटे आहेत. काहीही खरं नाहीये. सुरुवातीच्या दोन वर्षातले कार्यक्रम हे खरे होते जेव्हा मी इंडियन आयडॉलमध्ये जज होते. तेव्हा असं भावनिक नाटक नव्हतं. तुम्ही टीव्हीवर जे पाहत होतात ते खरं होतं. पण आता परिस्थिती बदललीये. आता सगळं एडिट केलेलं असतं. निर्माते प्रत्येक गायकाला सकारात्मक दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातल्या एकाला अचानक दुसऱ्या दिवशी काढून टाकतात. त्यामुळे प्रेक्षकही गोंधळतात. हा सगळं प्लॅन असतो.’
ती पुढे म्हणाली, ‘निर्माते येऊन सांगतात की कोणत्या स्पर्धकाला पुढे न्यायचंय आणि कुणाला नाही. त्यांना हवं त्याचं स्पर्धकाला ते वाचवतात. या सगळ्या प्रकारांमुळे मी अशा कार्यक्रमात परीक्षक म्हणून जाणं बंद केलं. हे खूप धक्कादायक होतं की निर्माते तुम्हाला सांगतात कोणत्या स्पर्धकाला चांगलं बोलायचं आणि कुणाला नाही. मग तो चांगला गायला नाही तरी चालेल. कारण त्याच्यामुळे वाहिनीला फायदा होत असतो.’ यासोबतच सुनिधीने अनेक गायक ऑटोट्यून वापरत असल्याचंदेखील सांगितलं. तर काही गायक लाइव्ह कॉन्सर्टला देखील फक्त तोंड हलवत असतात, असं ती म्हणाली.