पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीपीला ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हणताना सिंचन आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख केला होता, असा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी चौकशीसाठी भाजपाला आव्हान दिलं. यावरून खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. “अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आलेलं नैराश्य अद्यापही दूर झालेलं दिसत नाही. याबाबत चौकशी पूर्ण झाली असून, न्यायालयाचे निर्णयही झाले आहेत. वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशाप्रकारची वक्तव्य येतात. हे विधान टाळता आलं असतं,” असं टीकास्र सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर सोडलं. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमागे सर्व महाराष्ट्र उभा आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यही अजित पवारांच्या पाठीमागे उभे राहत आहेत. आम्ही घेतलेल्या निर्णयाला समर्थन मिळत आहे,” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.