आमदार अपात्रते प्रकरणी मंगळवारी प सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. एवढंच नाहीतर, प्रसारमाध्यमांशी कमी बोलावं, असा सल्लाही दिला आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रता सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सुनावणीमध्ये सोमवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा असे आदेश कोर्टानं दिले होते. मात्र सुधारित वेळापत्रक सादर करण्यात न आल्यानं सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त करत अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तसेच त्यांनी आजही सुधारित वेळापत्रक सादर न केल्याचं वकिलांनी म्हटलं. यावर बोलताना न्यायालयानं आता विधानसभा अध्यक्षांना सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ देत असताना सुधारित वेळापत्रक सादर करण्याची ही शेवटची संधी असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी तीस ऑक्टोबरला होणार आहे.