ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाच्या भरपाईचा प्रश्न दिल्लीत, पवार-गडकरींची बैठक, आ.तनुपरे उपस्थित
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित सुरत हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी या भूसंपादनात जाणार आहेत. त्यासंबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेण्यासाठी खा. शरद पवार यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिल्ली येथे सकारात्मक बैठक झाली. यात प्रामुख्याने शेत जमिनी आणि फळ बागांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याबद्दल तसेच इतर काही मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती आ.प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
महामार्गासाठी संपादित केले जाणारे राहुरी नगरपालिका हद्दीतील क्षेत्र हे ग्रीन झोनमध्ये येते. त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याइतकाच मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी आ.तनपुरे यांनी केली. यावेळी नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच याविषयी राज्य सरकारच्या संबंधित खात्याकडे बैठका लावण्याच्या देखील सूचना केल्या.