विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी सरकारविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याची घोषणा केली. सरकारने मंदिरावर नियंत्रण आणले असून सरकारने नेमलेल्या समितीकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आला. मुघल आणि ब्रिटीश राजवटीत मंदिरांबद्दल जो दृष्टीकोन ठेवला गेला होता, तसाच दृष्टीकोन सरकारकडून ठेवला जात आहे, असा आरोपही व्हीएचपीकडून करण्यात आला. सुरेंद्र जैन पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारकडून मंदिराच्या संपत्तीची लूट केली जात आहे. ज्यांना सरकारमध्ये सामावून घेता येत नाही, अशा नेत्यांना मंदिर समितीवर नेमण्यात येते. तसेच तिरुपती येथील प्रसादामध्ये भेसळ आढळल्या प्रकरणी ते म्हणाले की, प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आढळल्यामुळे संपूर्ण हिंदी समाजाच्या भावना दुखावल्या असून असंतोष पसरला आहे. तसेच केरळच्या शबरीमाला आणि इतर महत्त्वाच्या मंदिरातील प्रसादातही भेसळ झाल्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. याप्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने मंदिरांवर नियंत्रण ठेवणे असंवैधानिक असल्याचे सांगत सुरेंद्र जैन यांनी अनुच्छेद १२ चा दाखला दिला. राज्याला धर्म नसतो, असे या अनुच्छेदात म्हटले आहे. मग राज्य सरकारला मंदिराचे नियंत्रण करण्याचा अधिकार कोण देतो? अनुच्छेद २५ आणि २६ द्वारे आम्हाला आमच्या संस्था चालविण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होतो. जर मुस्लीम त्यांच्या धार्मिक संस्था चालवू शकतात तर हिंदू का नाही? असाही सवाल सुरेंद्र जैन यांनी उपस्थित केला.
मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हटवा….विश्व हिंदू परिषद देशव्यापी आंदोलन छेडणार…
- Advertisement -