स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केली आहे. या गटार गंगेविषयी मी अधिक बोललो तर माझी जीभ विठळेल, असं राजू शेट्टी म्हणालेत. सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी मेळावा काल संध्याकाळी पार पडला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुकीत बदल घडवेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करेन, असंही त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन वेळा भेटलो. पण काहीही उपयोग झाला नाही. कारखान्याच्या गोदामातील साखरदेखील बाहेर येऊन देणार नाही.कोल्हापुरात साखर अडवली जाऊ लागली आहे. आता आम्ही रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत वापरु देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.