स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
सरकारने ठरवून दिलेल्या साखर विक्रीच्या किंमती पेक्षा साखर कारखान्यांना प्रती क्विंटल 500 रूपये अधिक मिळाले आहेत. शिवाय इथेनाॅलच्या खरेदी दरात चांगली वाढ झाली आहे. त्या हिशोबाने साखर कारखान्यांनी प्रति टन 400 रूपये देणे लागत आहे. ती थकीत रक्कम लवकर द्यावी अन्यथा साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला.