नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील प्राथमिक शिक्षकांना वारंवार त्रास देणाऱ्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या कडे केली आहे.
या संदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे बापूसाहेब तांबे, दत्तापाटील कुलट, बबनदादा गाडेकर, राजेंद्र निमसे, बाळासाहेब कापसे, सुरेश निवडुंगे, गहिनिनाथ पिंपळे, संतोष खामकर, संजय दळवी, संजय साठे, रणजीत कुताळ,संजय म्हस्के, गोरख वाबळे, अशोक कुटे, सचिन नाबगे, शिवाजी शिंदे, ईश्वर नागवडे, विजय कडूस, विलास कदम, भाऊसाहेब जाधव आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेवून निवेदन दिले.
यामध्ये म्हंटले आहे की, शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे केंद्रप्रमुख व पोषण आहार अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडेगाव केंद्रातील शिक्षकांची सहविचार सभा चालू असताना त्या गावातील स्वताला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता म्हणणारा भाऊसाहेब शिंदे याने बैठकीत घुसून शिक्षकांना दमदाटी करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणला. तसेच शिक्षकांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. महिला शिक्षकांना ही आक्षेपार्ह भाषा वापरली.
सदर इसमाकडून मागच्या काही काळापासून अनाधिकाराने वर्गामध्ये घुसून वर्ग तपासणीचे नाटक केले जात आहे. शिक्षकांना दमबाजी, बदली करण्याची धमकी देवून अपमानित केले जात आहे. या प्रकारामुळे या भागातील सर्व शिक्षक भयभीत झाले असून त्यामुळे त्यांच्या दैनदिन कामावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात नगर तालुका पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद देवून गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. तरी या समाज कंटकावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.