खम्मम: ” तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाईल,” असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अ.भा. काँग्रेस कमिटीचे पालेर मतदारसंघाचे निरीक्षक श्री. विनायक देशमुख यांनी व्यक्त केला.
श्री. देशमुख हे मागील पंधरा दिवसापासून तेलंगणात असून निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. खम्मम जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघ असून या निवडणुकीत दहा ही जागी काँग्रेस पक्ष विजयी होईल, असा ठाम विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला.
“राज्यात काँग्रेस आणि सत्ताधारी बी.आर.एस.या दोन पक्षांमध्ये लढत होत असून या निर्णायक लढतीत काँग्रेस पक्ष मोठ्या बहुमताने विजयी होऊन सत्तेत येईल. भाजपा, एम.आय.एम. बसपा , यांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नाही. काँग्रेस पक्षाने अत्यंत प्रभावीपणे राबविलेल्या प्रचार यंत्रणेमुळे राज्यात काँग्रेसची लाट निर्माण झाली आहे. प्रत्येक मतदार संघातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना पक्षाचे सहा कलमी वचन पत्र पोहोचविले जात आहे. मी पालेर मतदारसंघातील दररोज किमान सहा गावांना भेटी देऊन प्रचार यंत्रणेला गती देण्याचे काम करीत आहे. याशिवाय पक्षाचे सर्व निरीक्षक गावातील नाराजांशी संपर्क करून त्यांनाही कार्यरत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील बदलते राजकीय वातावरण पाहता तेलंगाना विधानसभा निवडणुकीचे निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरतील,” असा विश्वास श्री देशमुख यांनी व्यक्त केला.
पक्षाध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे, खा. राहुल गांधी, श्रीमती प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रेवंत रेड्डी व खम्मम जिल्ह्याचे मुख्य निरीक्षक माजी मंत्री श्री. नसीम खान यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातून सध्या तेलंगणात असलेले सर्व निरीक्षक प्रभावीपणे कार्यरत असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.