“धर्माच्या आधारावर मुस्लीमांना आरक्षण देता येणार नाही आणि आम्ही ते कधीही देणार नाही”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरकसपणे मांडली होती. लोकसभेच्या निकालानंतर भाजपाला स्पष्ट बहुमत गाठता आलेले नाही. आता त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा टेकू घ्यावा लागणार आहे. अशातच नायडूंच्या तेलगू देसम पक्षाच्या नेत्याने मुस्लीम आरक्षण कायम राहणार असल्याची भूमिका मांडली आहे. तेलगू देसम पक्षाचे नेते के. रवींद्र कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज एनडीएची दुसरी बैठक होत आहे. ५ जून रोजी झालेल्या प्राथमिक बैठकीनंतर आजच्या बैठकीत सरकार स्थापनेसंबंधी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होऊ शकते. तसेच आजच एनडीएच्या खासदारांचीही बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी हे ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. आजच्या बैठकीत आम्ही आमचे मुद्दे मांडू. यावेळी पत्रकारांनी त्यांना आंध्र प्रदेशमधील मुस्लीम आरक्षणासंबंधी प्रश्न विचारला. राज्यातील मुस्लीम आरक्षण कायम राहणार का? या प्रश्नावर बोलताना रवींद्र कुमार म्हणाले, “मुस्लीम आरक्षण जैसे थे राहिल. त्यात काहीच अडचण नाही.”