गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास टीम इंडिया विश्वचषकासह दिल्लीहून मुंबईत दाखल झाली. मुंबई विमानतळावरून ते मरीन ड्राईव्हवर पोहोचले. तिथून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली काढण्यात आली. वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेटपटूंचा मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी क्रिकेटपटू विजयी रॅलीमध्ये ओपन डेक बसमधून निघाले. काही अंतरावर जाताच बाजूला दिसलेल्या एका दृश्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना काही क्षण धक्का बसला.
क्रिकेटपटूंची विजयी रॅली जात असताना आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचं छायाचित्र काढण्यासाठी एक चाहता थेट झाडावर चढून बसला होता. चिंतेची बाब म्हणजे हा चाहता त्या झाडाच्या एका फांदीवर अगदी टोकावर पालथा झोपून हातातल्या मोबाईलवर आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंचा फोटो काढण्यात मग्न होता. ही बाब सर्वात आधी यशस्वी जैस्वालला लक्षात आली. त्यानंतर विराट कोहलीनंही हा प्रकार पाहिला. क्रिकेटपटूंना त्या चाहत्याची चिंता वाटू लागली. विराट कोहलीनं लागलीच ही बाब कर्णधार रोहित शर्माच्या निदर्शनास आणून दिली.