राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा निर्माण झालेल्या चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. तेलंगणाबाहेर महाराष्ट्रावर चंद्रशेखर राव यांनी लक्ष केंद्रित करून अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊन ‘ताकद’ दिली. पण तेलंगणातच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाल्याने राज्यात या पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तेलंगणाबाहेर भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, शिवसेनेसह विविध पक्षांच्या नेत्यांना गळाला लावण्यात आले.काही नेते मंडळींना सारी ‘ताकद’ देण्यात आली. नगरसह राज्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी तेलंगणाला भेट दिली. तेथील या पक्षाचे काम पाहुन त्यांना भुरळ पडली.
तेलंगणातील पराभवामुळे चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या योजनेला खीळ बसली आहे. तेलंगणातील पराभवामुळे राज्यातील नेत्यांना मिळणारी रसदीही कमी होण्याची चिन्हे आहेत. यामुळेच राज्यात मोठी घौडदौड करण्याची योजना असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर गेलेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच चलबिचल सुरू झाली आहे.