लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकरांचा झालेला विजय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ईव्हीएम मशीनचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातील घोटाळा हा देशातील निवडणूक घोटाळातला आदर्श घोटाळा असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.
मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात निवडणूक यंत्रणा हातात घेतली, जिथे जय पराजय दिसत होते तिथे अशा प्रकारे घोटाळे करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करण्यात आलं होतं, त्यानंतर पुन्हा दोन तास मतमोजणी करण्यात आली. ईव्हीएम हॅक होऊ शकतं, असं एलन मस्क सांगत आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे. अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास जाणून घ्यावा. वंदना सूर्यवंशी यांचा मोबाइलसुद्धा जप्त करावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
वायकर यांचा जवळचा माणूस निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा वनराई पोलीस स्टेशनमध्ये का चक्करा मारत होता? असा सवाल राऊतांनी केला आहे. आता फॉरेन्सिक लॅबमध्ये मोबाइल पाठवत आहेत. या लॅबचे प्रमुख फडणवीस, नंतर एकनाथ शिंदे आहेत. यामधून काय अपेक्षा करणार? असं संजय राऊत म्हणाले आहेत. वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा संपूर्ण निकाल रहस्यमय असल्याचं राऊतांनी म्हटलंय.