राजकारणात काहीही अशक्य नसते असे म्हटले जाते. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या स्थापनेपासून ‘एकला चलो रे!’ ची भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. महाराष्ट्रात दरारा आणि दबदबा असणारा हा नेता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर दिल्लीवारीवरून टीका करणाऱ्या या नेत्याने लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच स्वतःच दिल्लीवारी केली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राज ठाकरे लवकरच NDA मध्ये सामील होणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र, याच भेटीवरून उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी खरमरीत टीका केलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली. दिल्लीतील या भेटीमुळे निवडणुकीचा पारा आणखीनच वाढला आहे. याच दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया समोर आलीय. या भेटीमधून भाजपला कोणताही फायदा होणार नाही. भाजपचा महाराष्ट्रात भरवसा नाही, अशी टीका त्यांनी केलीय.
एकीकडे भारतीय जनता पक्ष ‘अब की बार, 400 पार’ चा नारा देत होता. पण, आता 200 चा आकडा पार करण्याइतकाही आत्मविश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात तुम्ही दोन पक्ष फोडले तरी जनतेच पाठींबा मिळत नाही हे त्यांना कळून चुकले आहे. तुम्ही सत्तेत नक्कीच आहात, पण तुम्ही केवळ सत्तेचा उपभोग घेत आहात. जनतेसाठी कोणतेही काम करत नाही, अशी टीकाही प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.