सध्या ब्युटी पार्लर, मसाज पार्लर, स्पा आणि हुक्का पार्लरचे सर्वत्र पेव फुटले असून या धंद्यांच्या आडून मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय केला जातो, अशी तक्रार नेहमीच केली जाते. परंतु त्या विरोधात फारशी कारवाई कधी केल्याचे ऐकण्यात येत नाही. परंतु आज नौपाडा पोलिसांनी अशाच एका ब्युटी पार्लरवर धाड टाकून दोन महिलांची सुटका केली आहे.
ठाण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नौपाडा भागात ‘शमा फॅमिली ब्युटी सलोन अँड स्पा’ या नावाने चालणाऱ्या व्यवसायाच्या आड वेश्याव्यवसाय केला जात असल्याची तक्रार नौपाडा पोलिसांना मिळाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी एक बोगस गिऱ्हाईक पाठवून येथील अवैध वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला. यावेळी स्पाच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले व दोन बळीत महिलांची सुटका देखील पोलिसांनी केली.
सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्वरित पावले उचलत एका बोगस गिऱ्हाईकाला येथे पाठवले. पोलिसांच्या या माणसाने आत जाऊन तेथील मॅनेजरकडे मुलीची मागणी केली. त्याला तिथे बसून स्पा मॅनेजरने त्याच्यासमोर दोन मुलींना उभं केलं आणि त्यातील एका मुलीला निवडण्यास सांगितले.
यावरून येथे वेश्याव्यवसाय सुरू आहे, याची खात्री पटताच तोतया गिर्हाईकाने बाहेर बसलेल्या पोलिसांना इशारा केला. यानंतर पोलिसांनी तातडीने ब्युटी सलोनवर धाड टाकत तेथील महिला मॅनेजरला ताब्यात घेतले.