नगर – जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ५७५ विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग झालेले नसल्याने तेथील शिक्षक तांत्रिकदृष्ट्या अतिरिक्त ठरणार होते. या प्रश्नी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले व माजी पंचायत समिती सदस्य रामदास भोर यांनी गुरुवारी (दि.२९) प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात २ तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे शिक्षण विभागाने गुरुवारी होणारे शिक्षकांचे समायोजन स्थगित केले आहे. आधार लिंक नसलेल्या ५७५ विद्यार्थ्यांची फेर पट नोंदणी केल्या नंतर हे समायोजन केले जाणार आहे.
याबाबत माहिती देताना संदेश कार्ले म्हणाले, जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचे गुरुवारी संच मान्यतेनुसार समयोजन होणार होते. या संच मान्यता करतांना विद्यार्थ्यांचे आधार ऑनलाईन लिंक करणे आवश्यक होते, परंतु जिल्ह्यातील ५७५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड लिंक झालेले नव्हते. त्यामुळे तेथील शिक्षक केवळ तांत्रिकदृष्ट्या अतिरिक्त ठरत होते.
त्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या दालनात सुमारे दोन तास ठिय्या मांडला व समयोजन स्थगित करण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे यांनी त्यांना दि. ५ सप्टेंबर पर्यंत समयोजन स्थगित केल्याचे पत्र दिले, तसेच शिक्षण उप संचालक यांना पत्र पाठवून त्यात आधार लिंक नसलेल्या मुलांची फेर पट नोंदणी करून नवीन संच मान्यतेची मागणी केली आहे.
वास्तविक एकीकडे सरकार शिक्षण हक्क कायद्याने मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्न करते व दुसरीकडे आधार लिंक नसल्याने शिक्षक कमी करते. गेल्या वर्षी अशाच अडचणीमुळे शासनाने केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी गटशिक्षण अधिकारी यांना संयुक्त पाहणी करून दुरुस्ती केली होती.
यंदाही तशीच सुविधा देऊन दुरुस्ती करावी अशी मागणी केली असल्याचे कार्ले यांनी सांगितले. यावेळी उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, नगर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बाबुराव जाधव, केंद्रप्रमुख डॉ. संजय कळमकर, केंद्रप्रमुख संजय धामणे उपस्थित होते.