अहमदनगर-बुरूडगाव रोड परिसर येथे अहमदनगर महापालिकेने बांधकामास सुरुवात केलेल्या अद्ययावत अशा रुग्णालयाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी फेटाळून लावली व याचिकाकर्ते असलेले सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी दाव्याच्या खर्चापोटी 10 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वसामान्य गरीब आणि गांजलेल्या रुग्णांंना अद्ययावत सुविधा आणि उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने बुरूडगाव रोड परिसर येथे रुग्णालय बांधण्यासाठी प्रसारित केलेल्या निविदेतील इस्टिमेटपेक्षा चार टक्के जास्तीची रक्कम संबंधित बांधकाम ठेकेदाराला दिली असून जनतेचा पैसा असा का जास्तीचा दिला, असा प्रश्न करून रुग्णालयाचे बांधकाम थांबवावे असे हेमंत ढगे यांंनी याचिकेत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, खंडपीठाने निकालात म्हटले आहे, की घटनेच्या कलम 226 मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, जनतेच्या हितासाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन यांना असे रुग्णालय बांधण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेष म्हणजे 12 जानेवारी 2022 रोजी महापालिकेने सभेत तसा ठराव मंजूर केला व जिल्हाधिकार्यांनी त्या ठरावास मान्यता दिल्यानंतर रुग्णालयाच्या बांधकामास मान्यता दिली. त्यानुसार बांधकाम सुरू करण्यात आले.
अहमदनगर महापालिकेच्या या रुग्णालय बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात मे. स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चर यांची एक आणि मे. गांधी कन्स्ट्रक्शन्स यांची एक अशा दोन निविदा आल्या होत्या. त्यातील मे. स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चरची निविदा ही महापालिकेच्या इस्टिमेटपेक्षा 15 टक्के जास्त दराची होती. त्यात संपूर्ण खर्च रक्कम 23 कोटी 84 लाख 34 हजार 238 रुपये दाखविला होता. मे. गांधी कन्स्ट्रक्शन्सची निविदा ही इस्टिमेटपेक्षा 09.99 टक्के जास्त दराची होती. मनपाने जास्त असलेल्या मे. स्पेक्ट्रम इन्फ्रास्ट्रक्चरऐवजी कमी दराच्या असलेल्या मे. गांधी कन्स्ट्रक्शन्सशी बोलणी सुरू केली. वाटाघाटीनंतर गांधी कन्स्ट्रक्शन्सने इस्टिमेटपेक्षा 09.99 टक्के जास्त असलेल्या रकमेवरून खाली येत 05 टक्के रक्कम कमी केली. त्यामुळे इस्टिमेटपेक्षा 04 टक्के जास्त रक्कम असलेल्या गांधी कन्स्ट्रक्शन्सला रुग्णालयाचे बांधकाम करण्याचा ठेका देण्यात आला.
यात जास्तीचे पैसे दिले गेल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे वास्तवाला धरून नसल्याने व रुग्णालयाचे बांधकामही 35 टक्क्यांच्या वर झालेले आहे, अशा वेळी त्या बांधकामाला स्थगिती देणे संयुक्तिक ठरत नाही असे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या दाव्यापोटी झालेला खर्च 10 हजार रुपये भरण्याचे आदेशही मुख्य न्यायमूती संत यांनी ढगे यांना दिले आहेत.
राज्यात मुंबई महापालिकेनंतर अहमदनगर महापालिकेच्यावतीने नगरमध्ये 150 बेडचे अद्ययावत हॉस्पिटलचे काम सुरु आहे. बुरुडगाव रोड परिसरात 150 बेडचे, तीन ऑपरेशन थिएटर असलेल्या हॉस्पिटलचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. गोरगरीब रुग्णांसाठी हे हॉस्पिटल तातडीने उभे राहावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी परिश्रम घेतले असून त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या हॉस्पिटलची इमारत पूर्णत्वाकडे जात आहे. हॉस्पिटलचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्यांचा आरोग्य सेवेचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.