Home क्राईम न्यूज नगर तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला , पोलिसांकडून तपास सुरू

नगर तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला , पोलिसांकडून तपास सुरू

0

अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात संशयास्पद परिस्थितीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. हॉटेल आदित्यनराजे समोर व हॉटेल श्री स्वामी समर्थच्या पाठीमागील भोयरे पठार गावाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्याच्या परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यादृष्टीकोनातून तपास सुरू केला आहे.

चास शिवारात भोयरे पठार गावाकडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर संशयास्पद परिस्थितीत एका तरूणाचा मृतदेह असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. माहिती मिळताच अहिल्यानगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर तरुणाचा मृत्यू कशातून झाला याचे कारण समोर येणार आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर मृत तरुणाचे अंदाजे वय 30 वर्षे आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. जर कोणास या तरुणाबाबत काहीही माहिती असेल, तर त्यांनी तातडीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मयत तरुणाची ओळख पटलेली नाही. मात्र त्याचा गळा आवळून खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीकोनातून तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी सोमवारी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.