अहमदनगर -यंदाचा खरीप हंगामात उत्कृष्ठ बियाणे, मुबलक खते आणि समाधानकारक पाऊस झाल्याने पिके बहरात आली आहे. शेतकर्यांची लक्ष्मीही सोनपावलाने कापूस खरेदी केंद्रावर दाखल होत आहे. आता कृषी विभागाने पुढील रब्बीचीही तयारी सुरू केली असून, कांद्याचे वाढणारे संभाव्य क्षेत्र लक्षात घेता जिल्ह्याला तीन लाख मे.टन. खतांचा पुरवठाही मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक खतसाठा हा नगर जिल्ह्याला मिळणार आहे.
जिल्ह्यात खरीपाची 9 लाख हेक्टवर पेरणी झाली. यात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीदाचे क्षेत्र वाढलेले दिसले. कपाशीचे 1 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र आहे. कांदा, भाजीपाला, मसाला पिके वगळून खरीपाचे निव्वळ क्षेत्र हे साधारणतः पाच लाख हेक्टवर इतके राहिले होते. उडीद आणि मुगाच काढणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी बाजरीही सोंगणी सुरू आहे. कपाशीही पहिलीची वेचणीही सुरू झाली आहे. दसर्यानंतर कपाशीचे मार्केट खर्याअर्थाने वाढणार आहे. दरम्यान, खरीपासाठी सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे, निरीक्षक अमृत गांगर्डे व त्यांच्या टीमने बियाणांचा काळाबाजार रोखतानाच खतांचा पुरवठाही मुबलक उपलब्ध केला होता. त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक लूट रोखताना खते-बियाणांतही विश्वास मिळाला. त्यात निसर्गानेही चांगली साथ दिली. त्यामुळे आज खरीप डौलात उभा आहे. शेतकर्यांच्या चेहर्यावरही समाधान दिसत आहे.
आता कृषी विभागाने रब्बीचीही पूर्वतयारी सुरू केली आहे. 1 ऑक्टोबर नंतर खते, बियाणांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. साधारणतः 8 लाख 21 हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने खतांची मागणी केली होती. नुकतीच त्यास मंजुरी मिळाली आहे.
सध्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ला आहे. अनेक ठिकाणी कांदा 5000 पार झाल्याचेही कानावर येत आहे. त्यात पाऊस चांगला झाल्याने शाश्वत पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. दोन लाख हेक्टरच्या वरती कांदा लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी खताचे नियोजन झाले आहे. यामध्ये युरीया 1 लाख, डीएपी 2 लाख 50 हजार, एमओपी 1 लाख, एनपीके 12 लाख, एसएसपी 6 लाख मे.टन खते मंजूर झाली आहे. पहिल्या पाचमध्ये नगरला तीन लाख, त्या खालोखाल नाशिक 2 लाख 75 हजार, सोलापूर 2 लाख 29 हजार, पुणे 2 लाख 10 हजार आणि जळगाव 2 लाख 9 हजार मे.टन खते मिळणार आहेत.