Monday, February 17, 2025

….. अखेर हतबल होऊन पळून गेलेले प्रेमी युगुल पोलिसांत झाले हजर ,नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर -जवळ असलेले सर्व पैसे संपल्यावर पळून गेलेले प्रेमी युगुल नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याने तरुणावर अत्याचारासह पोक्सोचे वाढीव कलम लावण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर त्या मुलीला स्वीकारण्यास तिच्या कुटुंबियांनी नकार दिल्याने तिची रवानगी रिमांडहोममध्ये करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील एका गावातून एका 16 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने 29 ऑगस्टच्या रात्री 10.30 ते 30 ऑगस्टच्या पहाटे पाचच्या दरम्यान फूस लावून पळवून नेले होते.याबाबत तिच्या वडिलांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस या दोघांचा शोध घेत होते. मात्र ते दोघेही पोलिसांना चकवा देत होते. महिनाभर ते पोलिसांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना चकवा देत पर्यटन करत फिरत राहिले. मात्र त्यांनी पळून जाताना नेलेले पैसे महिनाभरात संपले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मग त्यांना परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यांची प्रेमाची नशाही उतरली. भटकंती करत जीवन जगणे यापुढे अशक्य वाटू लागल्याने त्यांनी कुटुंबियांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबियांनी त्यांना कुठलाच प्रतिसाद दिला नाही.

अखेर हतबल होत त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघे नगर तालुका पोलीस ठाण्यात हजर झाले. अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणारा तरुण हा नगर तालुक्यातीलच खंडाळा गावातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी सदर अल्पवयीन मुलीचा जबाब महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या समोर नोंदवून घेतला. तिच्या जबाबानुसार तरुणावर अत्याचार तसेच पोक्सो कायद्यान्वये वाढीव कलमे लावण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles