Wednesday, November 13, 2024

माजी महापौर संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उच्च न्यायालयाने उठवली

नगर (प्रतिनिधी) – माजी महापौर संदीप भानुदास कोतकर यांना घातलेली जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.१८) हा निर्णय दिला आहे. संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात फटाके फोडून जल्लोष केला.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्या आधीपासून नगर शहरात माजी महापौर संदीप कोतकर हे निवडणूक लढविणार किंवा कसे याबाबत उलटसुलट चर्चा चालू होत्या. संदीप कोतकर यांना जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी अपील केले होते. त्यावर काय निर्णय लागतो याकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या होत्या. कोतकर यांच्या अर्जावर अखेर आज निर्णय झाला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, माजी महापौर संदीप कोतकर यांना एका खुन प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती.

विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर आज यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे.

कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
दरम्यान, संदीप कोतकर यांचे नगर शहरात अनेक वर्षानंतर आगमन होत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. यानिमित्ताने संदीप कोतकर हे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार यात शंका नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles