संगमनेरमधील पतसंस्था विश्वातील सर्वात मोठा आर्थिक ठरलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील तब्बल ८१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार असलेला प्रतिष्ठित राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य व दूधगंगा संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब दामोदर कुटे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून गेल्या नऊ महिन्यांपासून कुटे फरार होता.
कुटे गुरुवारी दुपारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर येत असून त्याला पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर बसविण्यात आले होते. कुटे याला ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला कळविण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी संगमनेरमधून त्याला ताब्यात घेत अटक करतील अशी माहिती समजते.
कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईकांच्या या गुन्ह्यात सहभाग आहे. गेल्याच आठवड्यात कुटे याच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर आज गुरुवारी भाऊसाहेब कुटे पोलिसांना शरण आला.
भाऊसाहेब कुटे याच्यासह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळा प्रकरणी १७ प्रमुख आरोपींसह त्यांना सहाय्य करणाऱ्यांसह एकूण २१ आरोपीं विरोधात फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास अहमदनगर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहे.