अहमदनगर-मोक्का गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने या गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्र असा एक लाख 92 हजार 700 रूपयांचा ऐवज नेला.
गुरूवारी (8 ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास काटवन खंडोबा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे ही घटना घडली. या प्रकरणी अॅड. नाजमीन वजीर बागवान (वय 32) यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
किरण कोळपे विरोधात 2022 मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचे वकिलपत्र फिर्यादी यांच्याकडे होते. त्यावेळी फिर्यादी व किरण यांची ओळख झाली होती. दरम्यान किरण विरोधात 2023 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. या गुन्ह्याचे कामकाजही फिर्यादी पाहत होत्या. त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती व नंतर जामीन मिळाला होता.
दरम्यान, गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या काटवन खंडोबा येथील घरी असताना किरण तेथे आला. त्याने फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून फिर्यादीचा बळजबरीने हात पिरगाळून दुखापत केली. घरातील कपाटाची उचकापाचक करून त्याने साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील सोन्याच्या साखळ्या, 32 हजार 700 रूपयांची रोकड व किरण याच्याविरूध्द दाखल मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्रे नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करत आहेत.