अहमदनगर-काटवन खंडोबा परिसरातील एका महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत ऐवज लुटणार्या व पकडल्यानंतर जिल्हा रुग्णालयातून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून ताब्यात घेतले आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद ता. नगर) असे त्याचे नाव आहे. किरण कोळपे विरोधात 2023 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. त्या गुन्ह्याचे वकिलपत्र अॅड. नाजमीन वजीर बागवान (वय 32) यांच्याकडे होते. त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती व नंतर जामीन मिळाला होता. दरम्यान, गुरूवारी (8 ऑगस्ट) दुपारी साडेचारच्या सुमारास अॅड. बागवान त्यांच्या घरी असताना किरण तेथे आला. त्याने अनधिकाराने घरात प्रवेश करून अॅड. बागवान यांचा बळजबरीने हात पिरगाळून दुखापत केली.
घरातील कपाटाची उचकापाचक करून एक लाख 92 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. यासंदर्भात अॅड. बागवान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी (9 ऑगस्ट) अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता, तेथून तो पसार झाला होता. तो पत्रकार चौकाकडे पळत असताना कोतवाली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो मिळून न आल्याने त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, अभय कदम, अमोल गाडे, विशाल दळवी, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंड्डू यांचे पथक त्याचा शोध घेत होते. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्या माहितीवरून कोळपे हा कल्याण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला कल्याणमधील विठ्ठलवाडी भागातून रविवारी ताब्यात घेतले आहे. त्याला अॅड. बागवान यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.