मोकाट कुत्र्यांचा हैदोष, नागरिक भयभीत, आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन.
नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा महापालिकेत कुत्रे सोडणार – मा. स्थायी समिती सभापती मनोज कोतकर
नगर – शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून केडगाव उपनगरांमधील कॉलन्यांमध्ये अक्षरशः २५ ते ३० कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून रात्री अपरात्री नागरिकांना घरी येणे कठीण झाले आहे. तर दिवसा ढवळ्या शाळकरी विद्यार्थ्यांवर कुत्र्यांची टोळकी हल्ला करत आहे. या आधी शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये काही मुलांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.अजून किती दिवस नागरिकाचा जीवाशी महानगरपालिका खेळणार आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोष सुरू असून नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहे. तरी अहमदनगर महानगरपालिकेने येत्या आठ दिवसांमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेत मोकाट कुत्रे सोडण्याचे आंदोलन केले जाईल. असा इशारा स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.