अहिल्यानगर महानगरपालिकेच्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरु

0
96

महानगरपालिकेमार्फत जप्त केलेल्या मालमत्ताधारकांना थकीत कर भरण्यासाठी अखेरची संधी

३१ मार्चनंतर मालमत्तांचा लिलाव होणार; महानगरपालिकेकडून प्रक्रिया सुरू

मालमत्ताधारकांना थकीत कर भरण्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आवाहन

अहिल्यानगर – मालमत्ता कर विभागाकडून मालमत्ता कर व पाणीपट्टी थकविणाऱ्या बिगरनिवासी, व्यावसायिक व इतर अशा २० मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराची संपूर्ण थकीत रक्कम ३१ मार्चपूर्वी महानगरपालिकेकडे जमा न केल्यास त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्याची प्रक्रियाही प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. ज्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्यांना थकीत कर भरण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची संधी आहे. त्यानंतर केव्हाही लिलाव होणार आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ थकीत भरून मालमत्तेचा लिलाव टाळावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

महानगरपालिकेने थकबाकीदारांना शास्तीमध्ये सवलत दिलेली आहे. त्याऊपरही थकीत कर न भरल्यास जप्ती कारवाई केली जात आहे. महानगरपालिकेने २० मालमत्ता जप्त केल्या असून, ४४ नळ कनेक्शन तोडले आहेत. सदर थकबाकीदारांना सर्व थकीत कराची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यांच्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रियाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. ३१ मार्च पर्यंत त्यांनी थकीत कर न भरल्यास ३१ मार्च नंतर कोणत्याही दिवशी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. तसेच, त्यांच्या मालमत्ता करावर अधिकचा १५ टक्के लिलाव खर्च लावण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत कराचा भरणा करावा अन्यथा सदर मालमत्तांचा महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी लिलावाची नोटीसही वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे. मालमत्ता लिलावामध्ये विकली गेली नाही, तर १ रुपयाच्या नाममात्र बोलीवर महानगरपालिका सदर मालमत्ता खरेदी करणार आहे.

दरम्यान, जे मालमत्ताधारक थकीत कराचा पूर्ण भरणा ३१ मार्च पर्यंत करतील, अशा मालमत्ता लिलाव प्रक्रियेतून वगळल्या जाणार आहेत. ज्यांनी अंशतः रक्कम भरली असेल, त्यांच्या मालमत्तांचाही लिलाव होणार आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांनी लिलाव टाळण्यासाठी संपूर्ण थकीत कराचा भरणा करावा. जप्ती कारवाई टाळण्यासाठी इतर थकबाकीदारांनीही थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.


थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरु
शहरामध्ये मालमत्ताकराची थकबाकी असणाऱ्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरु असून तात्काळ कर भरुन जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांपैकी ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही कराचा भरणा केला नाही, अशा २० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, अशा मालमत्ताधारकांनी थकीत कराचा संपूर्ण भऱणा ३१ मार्च पूर्वी करुन आपल्या मालमत्तेचा लिलाव टाळावा, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.