अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादीने केली पोलीस संरक्षणाची मागणी
खटल्यातून मागे होण्यासाठी आरोपींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप
फिर्यादीसह चत्तर कुटुंबीय दहशतीच्या सावटाखाली
अहमदनगर (प्रतिनिधी)- खटल्यांमधून मागे हटण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करुन अंकुश चत्तर खून प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब सोमवंशी याने स्वत: व चत्तर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या खून प्रकरणातील आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्याकडून मला व चत्तर कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले आहे.
अंकुश चत्तर खून प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, जिल्हा न्यायालयात हा खटला चालवला जात आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 24 जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे कोर्टाकडून केस इतरत्र कोणत्याही न्यायालयात व इतर न्यायाधीशांसमोर चालविण्याबाबत अर्जही करण्यात आलेला आहे. त्यानंतर सदर अर्ज मागे घेण्यासाठी मला आरोपीचे भाऊ यांनी कोर्टामध्ये येऊन दमदाटी केली. त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे 13 ऑगस्ट रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तो अभी बुलाख याचा भाऊ आहे.
सदर खटल्याची तारीख 31 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात असून, या तारखेला सुद्धा सदर व्यक्तींकडून खटल्यातून मागे हटण्यासाठी मला, माझ्या घरच्यांना व मयत अंकुश चक्कर यांच्या घरच्यांना धमकाविणे किंवा जीवाचे बरे वाईट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. सदर व्यक्ती कोर्टामध्ये येऊन दमदाटी करतात. अंकुश चक्कर यांच्या घरच्यांनाही दमदाटी व इतर प्रकारे या खटल्यातून माघार घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत असल्याचे फिर्यादी सोमवंशी यांनी म्हंटले आहे. तर खून प्रकरणातील आरोपींच्या जवळच्या व्यक्तींकडून संरक्षण मिळण्यासाठी तात्काळ पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगर शहरातील अंकुश चत्तर खून प्रकरण, फिर्यादीने पोलीसांकडे केली मोठी मागणी
- Advertisement -