नगर शहर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार आहे. स्थानिक पातळीवर सर्व इच्छुक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून एक नाव निश्चित करा. यंदा कोणत्याही परिस्थितीत नगरची जागा परत मिळवायची आहे, अशा सूचना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे)यांनी नगरच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल, गुरूवारी मातोश्री येथे नगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळीपक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत नगर शहर व इतर जागांवरील उमेदवारी, सध्याची परिस्थिती, इच्छुकांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख संभाजी कदम आदी उपस्थित होते.
नगर शहर मतदारसंघात प्रा. गाडे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पदाधिकाऱ्यांनी व इच्छुकांनी स्थानिक पातळीवर एकत्र बसून उमेदवारीबाबत एकाचे नाव निश्चित करावे. नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.त्यामुळे नगरची जागा परत घेण्याच्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे ठाकरे यांनी सांगितले.