एकीकडे लंपी आजाराने थैमान घातले असतानाच पशु वैद्यकीय दवाखाना दारूचा अड्डा बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडच्या नाळवंडी गावातील एका शेतकऱ्याने याची पोलखोल केली असून या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यात लंपी आजाराने थैमान घातले असून जिल्ह्यातील पशूंचे आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. गाव खेड्यातील जनावर वाचवण्यासाठी शेतकरी धावपळ करत असतानाच पशु वैद्यकीय दवाखाना दारु अड्डा सुरू असल्याचा प्रकार समोर आला.
बीडच्या नाळवंडी गावातील एका शेतकऱ्याने या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली. विशेष म्हणजे या दवाखान्यात ड्युटीवर असलेल्या लांडगे नामक शिपायानेच दवाखान्याला दारूचा अड्डा बनवला. धक्कादायक बाब म्हणजे याबद्दल विचारणा केली असता त्याने शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली. या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बीडसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोग आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे