नगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शंकर गोरे व डॉ. पंकज जावळे यांनी दिलेल्या सर्व बांधकाम परवानगी प्रकरणांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील शाकीर शेख यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. गोरे व डॉ. जावळे यांच्या कारकीर्दीत मंजूर करण्यात आलेले रेखांकन व बांधकाम परवानगीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा शेख यांचा होता. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
डॉ. जावळे यांनी बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी संबंधित बिल्डरकडे 8 लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जावळे व त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने नगर रचना विभागात सन 2021 ते जून 2024 पर्यंत गोरे, जावळे व चारठणकर यांनी मंजुरी दिलेले रेखांकन (ले आऊट), बांधकाम परवाना याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी महासंचालक यांच्याकडे केली होती. त्यांनी त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (परिक्षेत्र नाशिक) यांना चौकशी करण्याबाबत कळवले.
त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांना गोपनीय आदेश करून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्याची आदेश केले आहे. गोरे, जावळे व चारठणकर यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर नियमबाह्यरित्या लेआऊट मंजुरी व बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत. जावळे यांनी ग्रीन बेल्टमध्ये आरक्षित असलेले मोठ्या प्रमाणावर जमिनीचे लेआऊट बेकायदेशीरपणे परवानग्या दिलेले आहे. एजंटच्या मोबाईलच्या सीडीआर काढण्यात यावे व बांधकाम धारकांकडून बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी कोण कोणत्या अधिकार्यांनी लाच घेतलेली आहे किंवा मागितलेली आहे याची चौकशी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे.