पारनेर तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनने रस्ता कामाची प्रशासकीय मान्यता देण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कमेच्या दोन टक्क्याप्रमाणे साडेपाच लाखांची मागणी करून तडजोडीअंती चार लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्याच्याविरूध्द पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील बाबुराव फापाळे (रा. बेट वस्ती, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) असे त्या अव्वल कारकूनाचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पसार झाला आहे. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पारनेर तालुक्यातील तक्रारदार यांच्या गावातील 11 रस्ता काँक्रीटीकरण कामाचा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता.सदर कामाचे ठराव कागदपत्रांसह पारनेर तहसीलदार तथा गट कार्यक्रम अधिकारी म.ग्रा.रो.ह.यो. यांना सादर केले होते. त्यानंतर तहसीलदार यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देण्याकरीता उप अभियंता, जि.प.सा.बां. उप विभाग, पारनेर यांना पत्र दिले होते. त्यावरून उप अभियंता यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून व तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता करिता तहसीलदार यांना सादर केले होते. 11 कामाची प्रशासकीय मान्यता देण्याकरीता सदर कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या तीन टक्के प्रमाणे रक्कमेची लाच मागणी केले बाबतची तक्रार 15 ऑक्टोबर 2024 रोजी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 ऑक्टोबर रोजी लाच मागणी पडताळणी केली.
पडताळणी कारवाई दरम्यान अव्वल कारकून फापाळे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्या गावातील 11 रस्ता काँक्रीटकरण कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या दोन टक्के प्रमाणे स्वतः करिता व तहसीलदार यांच्या करिता पाच लाख 50 हजार रूपये लाच मागणी करून तडजोडीअंती चार लाख रूपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली, असे निष्पन्न झाले. दरम्यान, फापाळे याने तक्रारदार यांच्याकडून रक्कम स्वीकारली नसल्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पारनेर पोलीस ठाण्यात फापाळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तो पसार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष शिंदे, राधा खेमनर, चंद्रकांत काळे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तहसीलदारांचे नावही घेतले
फापाळे याने तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करताना रस्ता काँक्रीटकरण कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेच्या दोन टक्के प्रमाणे स्वत: करीता व तहसीलदार यांच्याकरीता पाच लाख 50 हजार रूपये मागणी करून तडजोडीअंती चार लाख रूपये लाचेची मागणी केली व सदर रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. फापाळे याने तहसीलदार यांच्या नावाने लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, तहसीलदार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झालेला नाही. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांना विचारणा केली असता कारवाई दरम्यान फापाळे याने तहसीलदार यांचे नाव घेतले होते परंतू पुढील कारवाईत ते सिध्द झाले नसल्याचे सांगितले. तपासाचा भाग म्हणून अधिक माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.