नगर तालुक्यातील दरेवाडी येथे नारायण डोह रस्त्यावर एका शेतात सुरू असलेल्या कामावेळी दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियातील आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) व काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी पोलिस ठाण्यात आमनेसामने आले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
याबाबत मच्छिंद्र भानुदास बेरड (४२, रा.दरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष लहानू सूर्यवंशी, हरिभाऊ खर्से (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), पवन रामप्रसाद धूत (रा. सारसनगर), जगदीश रामविलास करवा (रा. फलटण, जि. सातारा), सिद्धार्थ बाळासाहेब भिंगारदिवे (रा. दरेवाडी), संतोष सूर्यवंशी याची दोन मुले (नाव माहित नाही, रा. सारसनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेरड हे शेत जमिनीत काम करत असताना आरोपींनी शेतीचे लोखंडी जाळीचे कंम्पाऊंड तोडून नुकसान केले. त्याचा जाब विचारल्यावर बेरड यांना शिवीगाळ, लाथाबुक्यांनी मारहाण केली. बेरड यांची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुसऱ्या गटाकडून हरिभाऊ जिजाबा खर्से (रा. बुऱ्हाणनगर) यांनी फिर्याद दिली.
आमदार जगतापांवर केलेले आरोप दुपारनंतर मागे
घटनेनंतर बेरड यांनी सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल करून आमदार संग्राम जगताप यांच्यावर केले. त्यांच्या समर्थकांनी जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी म्हटले. दुपारी मात्र बेरड यांनी पुन्हा व्हिडिओद्वारे खुलासा करत या घटनेशी आमदार जगताप यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ज्यांनी गैरकृत्य केले त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या घटनेचे राजकीय भांडवल करू नये, असेही बेरड यांनी स्पष्ट केले.
जागा मालकाने आरोप फेटाळले
जागामालक पवन धूत यांनी त्यांचे वकील ॲड. पीयूष पुरोहित यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन बेरड यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. गट क्रमांक ७७ हे क्षेत्र ३१६ गुंठे आहे. यात पवन रामप्रसाद धूत, जगदीश रामविलास करवा, संतोष लहानू सूर्यवंशी यांची १८८ गुंठे जागा आहे. तसेच, स्नेहल विष्णू मोहिते यांची ८४ गुंठे जागा आहे. मच्छिंद्र भानुदास बेरड, उमेश बाबासाहेब जायभाय यांची एकत्रित २० गुंठे जागा आहे. मागील वर्षी मोहिते व बेरड यांच्यात करारनामा होऊन बेरड यांना २० गुंठे क्षेत्र निश्चित करून देण्यात आले. इतर जागा मालकांमध्ये जागा विकसित करण्यासाठी हरिभाऊ खर्से यांच्याशी करार झाला. १० सप्टेंबर रोजी त्याचे काम सुरू झाले. त्यावेळी बेरड हे सर्वांबरोबर उपस्थित होते. कोणीही कुणाच्या क्षेत्रात ताबा मारलेला नाही.
बेरड यांनी समोरचे केवळ व्यापारी आहेत, त्यांच्याकडून जादा पैसे उकळण्यासाठी मोठ्या राजकीय व्यक्तीचे नाव घेऊन स्टंट केला, असा आरोप यावेळी धूत व ॲड. पुरोहित यांनी केला आहे. इतर भागीदारांशी बोलून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे धूत यांनी सांगितले.
भिंगार पोलिस ठाण्यात जगताप विरोधक व समर्थकांची धाव
घटनेनंतर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे विक्रम राठोड, संभाजी कदम, योगीराज गाडे, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर, काँग्रेसचे किरण काळे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक गजानन भांडवलकर, मयूर बांगरे, सुहास शिरसाठ, मयूर राऊत यांच्यासह इतर कार्यकर्ते पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.