Thursday, January 23, 2025

नगर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण होणार, मनपात आढावा बैठक

अहिल्यानगर-शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याव्दारे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे. मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत.
दरम्यान, गेल्या 20 वर्षांत शहरात सर्वेक्षण झालेले नाही. महापालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पुनर्मुल्यांकन करणे अपेक्षित आहे. आता हाती घेतलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे व पुनर्मुल्यांकनामुळे शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी होईल. मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदीनुसार कर आकारणी केली जाणार आहे. यातून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास डांगे यांनी व्यक्त केला.

प्रशासक तथा आयुक्त डांगे यांनी गुरूवारी महानगरपालिकेत सर्वेक्षणाचा आढावा घेतला. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सर्व जमीन व इमारती यांचे सर्वेक्षण करून आवश्यक माहिती संकलीत करणे, मूल्यांकन व आवश्यक तांत्रीक सेवा संगणकीकरण करणे, विविध आज्ञावली विकसीत करून इतर कामे करणे, यासाठी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून मे. सी. ई. इन्फो सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मालमत्तेची डिजीटल छायाचित्रे, जिओ टॅगींग, तसेच मालमत्तेच्या अंतर्गत मोजमापांसाठी, त्यांचे कारपेट व बिल्टअप क्षेत्र डीजीटल उपकरणांव्दारे मोजण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे वसुली लिपिक व मे. सी. ई. इन्फो सिस्टीम लिमिटेड यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत हे काम केले जात आहे. त्यासाठी वसुली लिपिक व वसुली मदतनीस आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.

मालमत्ताधारकांनी मालमत्ता सर्वेक्षणासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांची ओळख तपासून त्यांना सहकार्य करावे. त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी. सर्वेक्षणाचे काम हे अहिल्यानगर महानगरपालिका विनामूल्य करत असून यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्वेक्षणामुळे सर्व मालमत्तांना कर आकारणी होईलच. मात्र, यामुळे मालमत्ताधारकांना आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे, असेही आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles