Thursday, September 19, 2024

नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, पुढील आठवडाभर जोरदार पाऊस बरसणार

अहमदनगर-सध्या हिंद महासागर विषुवृत्तीय भागात असलेली एमजेओची उपस्थिती आणि सध्या होत असलेली कमाल तापमानातील वाढ, यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवारपर्यंत (दि.25) महाराष्ट्रात शक्यतो दुपारनंतर, उष्णता संवहनी प्रक्रियेतून वीजा व गडगडाटीसह मध्यम ते जोरदार पाऊस बरसणार आहे. यामुळे खरीप हंगामात ताण बसलेल्या पिकांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी आणि नेवासा तालुक्यात काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिपरिप सुरू असल्याने सोयाबीन, कापूस, मका व अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव परिसरात काल दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला. राहुरीतही सर्वदूर पाऊस झाल्याने पिके तरारली आहेत. शहर व परिसरातही सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होता.

नगर शहरात सोमवारी दोन तासांहून अधिक वेळ पावसाचे दमदार आगमन झाले. यासह पारनेर तालुक्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात मध्यम ते भिज पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात अनेक महसूल मंडळांत पाऊस झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील आठ दिवसांच्या पावसाच्या अंदाजाबाबत भारतीय हवामान विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी तथा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, 20 ऑगस्टला नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या 11 जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता आहे. 21 तारखेला मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भातील अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 22 व 23 ऑगस्टला अहमदनगर, नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक, कोल्हापूर व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा 23 जिल्ह्यात पावसाची शक्यता असून 24-ऑगस्टला नंदुरबार, धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा 25 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. 25 ऑगस्टला मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. यामुळे राज्यातील सर्व धरणक्षेत्रातील पुन्हा जल-आवकेत वेगाने वाढ होणार असल्याचे खुळे यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारपासून नगर जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसत असून पावसाला सुरूवात झाली. सोमवारी दुपारी नगर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी दोन तासांहून अधिक काळ पाऊस झाला. पावसामुळे नगर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील बहुतेक रस्त्यांवर पाणी वाहू लागल्याने वाहतूक थांबली होती. काही ठिकाणी सखल भागातील घरांत पाणी शिरले. नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवाशांना जावे लागत होते. नगर तालुक्यातील जेऊर, आगडगाव, केडगाव, डोंगरगण आदी भागांतही जोरदार पाऊस झाला. डोंगरी पट्ट्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला होता. या पावसामुळे पिकांचे भरणे झाले आहे. तसेच नाले भरले आहेत. तळ्यांतही पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत होते. पारनेर तालुक्यात मध्यम ते भिज पाऊस असून श्रीगोंदा तालुक्यात अनेक महसूल मंडळात पाऊस झाल्याची माहिती मिळाली. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेली काही दिवस पावसाचा खंडामुळे पिकांना ताण बसला होता.

झालेला एकूण पाऊस
नगर 406 (22), पारनेर 415 (27), श्रीगोंदे 518 (56), कर्जत 500(3), जामखेड 542 (10), शेवगाव 363(18), पाथर्डी 501 (6), नेवासे 270(6), राहुरी 249 (9), संगमनेर 285 (4), अकोले 424(23), कोपरगाव 266(3), श्रीरामपूर 253(1), राहाता 254 (2) मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles