हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह तुफान पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मुंबईसह पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.