अहमदनगर -कल्याण रस्ता, शिवाजीनगर येथील बालाजी मंदिरासमोर असलेल्या केतन पार्क मधील शिक्षिकेचे घर चोरट्यांनी दिवसा फोडले. घरातून सुमारे साडे आठ ते नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, पाच हजारांची रोकड असा चार लाख 25 हजार 312 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. शुक्रवारी (20 सप्टेंबर) दुपारी तीन ते पावणे चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी शनिवारी (21 सप्टेंबर) दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षिका आशा विजय साके (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिक्षिका आशा साके यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्यांचे घर कडीकोयंडा, कुलूप लावून बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. सामानाची उचकापाचक केली. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडले. त्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण, दीड तोळ्यांचे नेकलेस, दोन तोळ्यांचे मिनी गंठण, साडेचार ग्रॅमचे कानातील झुबक्यांचे जोड, सोन्याची कानातील साखळी, एक ग्रॅमचे चार मणी, तसेच फिर्यादीच्या घरात संतोष गाडे यांची ठेवण्यात आलेली दीड तोळ्याची सोन्याची चेन, अर्धा तोळ्याची अंगठी, सहा ग्रॅमच्या बाळ्या व पाच हजारांची रोकड असा चार लाख 25 हजार 312 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
सदरची घटना पावणे चार वाजता उघडकीस आली. यानंतर साके यांनी तोफखाना पोलिसांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. दरम्यान, फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली असता नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपुत, उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी पथकासह शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. साके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत. दरम्यान, नगर शहर, उपनगरात वाढत्या चोर्या, दिवसा होणार्या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. दररोजच घटना घडत असल्याने पोलीस देखील हतबल झाले आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.