अहमदनगर-जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चार जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आवश्यक माहिती पोलिसांनी जिल्हा रूग्णालयाकडे मागितली आहे.
दिव्यांग प्रमाणपत्र काढताना रजिस्टरमध्ये नोंदी करण्यात आल्या असून त्याच्या झेरॉक्स प्रती रूग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मात्र पोर्टल सुरू झाले तेव्हा पासून आतापर्यंत किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले त्याची यादी पोलिसांना मिळालेली नाही. यामुळे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा तपास थंडावला आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच तपासाला गती येणार आहे.
जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी सागर केकाण, प्रसाद बडे, सुदर्शन बडे आणि गणेश पाखरे अशा चार जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील हे करत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच जिल्हा रूग्णालय व्यवस्थापनाला पत्र पाठविले होते. त्यात दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया कशी आहे, हे प्रमाणपत्र कोणाला दिले जाते, त्यासाठी संबंधितांची तपासणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत.
पोर्टल सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले त्याची यादी मागितली होती. ही प्रक्रिया कोणी आणि कशी राबविली, याबाबत पोलिसांकडून जिल्हा रूग्णालयाला विचारणा करण्यात आली आहे. त्यातून आतापर्यंत दिलेल्या सर्वच प्रमाणपत्रांची चौकशी होणार आहे. पोर्टल सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले, त्यांची यादी पोलिसांकडून मागविण्यात आल्याने सर्वच दिव्यांग प्रमाणपत्रांची शहानिशा पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
मात्र रूग्णालय प्रशासनाकडून रजिस्टर नोंदीच्या झेरॉक्स प्रती देण्यात आल्या असून अद्याप पोर्टल सुरू झाल्यापासून किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले याची यादी देण्यात आलेली नाही. ही यादी वरिष्ठ कार्यालयाकडून मागविण्यात आली असून त्यांच्याकडून ती प्राप्त झाल्यानंतर देण्यात येणार असल्याचे जिल्हा रूग्णालयाकडून पोलिसांना सांगण्यात आले आहे.
जिल्हा रूग्णालयात अर्जदारांची वैद्यकीय तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येतात. मात्र, धडधाकट लोकांनाही जिल्हा रूग्णालयातून प्रमाणपत्रे दिले गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील अधिकारी कर्मचार्यांचे कारनामे समोर आले असून, यात बड्या अधिकार्यांचाही हात असण्याची शक्यता आहे. सर्वच दिव्यांग प्रमाणपत्रांची शहानिशा पोलिसांकडून करण्यात येणार असल्याने दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेल्यांचेही धाबे दणाणले आहेत.