अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी शेततळ्यातील पाण्यात बुडून तीन शालेय विद्यार्थिनींना जलसमाधी मिळत मृत्यू झाला. सृष्टी उत्तम डापसे (इयत्ता सहावी, वय 13 वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (इयत्ता सहावी, वय 12 वर्ष) व अनुष्का सोमनाथ बढे (इयत्ता चौथी, वय 10 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावेत आहेत. शनिवारी (दि. 15) दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. घडलेल्या या घटनेने मेंढवन गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मेंढवन येथील सृष्टी, वैष्णवी, अनुष्का या तिनही विद्यार्थिनी लोणी येथील कन्या शाळेत शिक्षण घेत होत्या. शाळेचा पहिला दिवस असल्याने त्या शनिवारी सकाळी गावातील खाजगी वाहनाने शाळेत गेल्या होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्या गावाकडे परतल्या. त्यातील एकीच्या घरी त्यांनी जेवण केले. दरम्यान मेंढवन गावानजीकच्या सोमनाथ काशिनाथ बढे यांच्या शेतात नवीन खोदकाम करण्यात आलेले असून त्यात पावसाचे पाणी साठलेले आहे. सृष्टी, वैष्णवी, अनुष्का या विद्यार्थिनी शेततळ्याकडे गेल्या असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्या हातपाय धुण्यासाठी अथवा शेततळे बघण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या असाव्यात आणि पाय घसरून एखादी मुलगी पाण्यात पडली असावी व तिला वाचविताना इतर दोघीही पाण्यात बुडाल्या असाव्यात असा अंदाज आहे.