Monday, December 9, 2024

अहमदनगर जिल्ह्यात 3 सप्टेंबरपर्यंत ,वीजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

जिल्ह्याच्या काही भागात 3 सप्टेंबरपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा इशारा

नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर दि. ३०- जिल्ह्यात ३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफार्मवर जवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लांबणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे, नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.

अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४/ २३५६९४० वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles