राज्यामध्ये पुढील 24 तासांत काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये आज पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढतच चालला आहे. या परिस्थितीत वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान होत आहे.
हवामान विभागाने आज ८ एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. उन्हाच्या झळा आणि तीव्र उकाडा जाणवत आहे.
विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी २४ तासांमध्ये सोलापूर आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी म्हणजेच ४२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. आज राज्यात तापामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात ८ ते १० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह रायगड, पालघर, ठाण्यामध्ये तापमानात वाढ होणार आहे.