महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील कोणत्याही टोल नाक्यावर चार मिनिटांच्या आत वसूली झाली नाही तर अशा गाड्यांना टोल न घेता आता सोडलं जाणार आहे. तसेच टोलनाक्यावर असलेल्या 300 मीटरपर्यंतच्या पिवळ्या रेषेच्या बाहेर असलेल्या गाड्यांना टोल न घेताच सोडले जाणार आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडून टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेची आखणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या निर्णयामुळे आता नागरिकांचा वेळ आणि टोल दोन्ही वाचण्याची शक्यता आहे.
पथकर वसूली करारानुसार कोणत्याही टोल नाक्यांवर ज्या वाहनांना टोल भरण्यासाठी चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल त्या वाहनांना टोल न घेता सोडण्याची तरतूद आहे. तर टोलनाक्यापासून 300 मीटरच्या अंतरावर, पिवळ्या रेषेच्या पलीकडे असलेल्या वाहनांना टोल न घेता सोडावे अशीही तरतूद आहे. मात्र त्याचे पालन राज्यातील कोणत्याही टोल नाक्यांवर केले जात नसल्याचे दिसून आले आहे. मनसेसुद्धा त्यांच्या आंदोलनातून ही बाब सरकार आणि लोकांच्या पुन्हा निदर्शनास आणून दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग (उपक्रम) मंत्री दादा भुसे, एमएसआरडीसीचे अधिकारी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीतही राज ठाकरे यांनीसुद्धा हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर हा मुद्दा लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.