सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती सुरु झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महिना 50000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
कोकण रेल्वे भरती अंतर्गत एकूण 190 पदे भरली जाणार आहेत. रेल्वेच्या विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता, तंत्रज्ञ, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कमर्शियल पर्यवेक्षक, ट्रॅक मेंटेनर आणि पॉइंट मॅन या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी फक्त गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मूळ रहिवासी अर्ज करु शकणार आहेत. ज्या उमेदवारांनी आपली जमीन गमावली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे कोकण रेल्वेचे कर्मचारी आहेत ते देखील फॉर्म भरू शकतात.
अर्ज करण्याची अतिम तारीख 6 ऑक्टोबर 2024
दोन दिवसांपासून म्हणजे 16 सप्टेंबर 2024 पासून सुरू अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत फॉर्म भरता येईल. असे असले तरी उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि वेळेआधी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमधील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे तंत्रज्ञ पदासाठी संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा असलेले मॅट्रिक उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. 18 ते 36 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. 1 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल आणि आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.
उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे. सिनीअर सेक्शन इंजीनिअरला पदासाठी वेतन 49 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. तंत्रज्ञ पदासाठी 19 हजार 900 रुपये पगार आहे. स्टेशन मास्टर पदाचा पगार 35 हजार 400 रुपये आहे. त्याचप्रमाणे गुड्स ट्रेन मॅनेजर पदाचा पगार 29 हजार 200 रुपये इतका पगार आहे.